Event1 : Tapapurti Sohala

TAPAPURTI SOHALA - CELEBRATING 12 YEARS

4 April 2023
  • Balgandharva Rangmandir, PuneLocation

तालयोगी आश्रमाच्या तपपूर्तीनिमित्त मंगळवारी सांगीतिक सोहळा अमृत महोत्सवानिमित्त तालयोगी पद्मश्री पंडित सुरेश तळवलकर यांचा विशेष सन्मान श्री स्वामी सद्गुरू शंकराचार्य विद्या नृसिंह भारती आणि विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांची प्रमुख उपस्थिती

पुणे : पुण्याच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या तालयोगी आश्रमाची तपपूर्ती आणि तालयोगी पद्मश्री पंडित सुरेश तळवलकर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त मंगळवार, दि. 4 एप्रिल 2023 रोजी सांगीतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती तालयोगी आश्रमाचे अध्यक्ष उपेंद्र धर्माधिकारी, मंदार जोशी आणि श्रीनिवास केंदळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. तपपूर्ती सोहळा सायंकाळी 6 वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आला असून श्री स्वामी सद्गुरू शंकराचार्य विद्या नृसिंह भारती यांचे शुभाशीर्वाद लाभणार आहेत. विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सांगीतिक सोहळ्यात सत्यजित तळवलकर यांचे एकल तबलावादन होणार असून त्यांना तन्मय देवचक्के संवादिनी साथ करणार आहेत. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पद्मश्री पंडित उल्हास कशाळकर यांचे शास्त्रीय गायन होणार असून त्यांना तालयोगी पंडित सुरेश तळवलकर तबला तर मिलिंद कुलकर्णी संवादिनी साथ करणार आहेत. या कार्यक्रमात तालयोगी आश्रमाच्या वेबसाईटचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांचे शिष्य डॉ. श्रीनिवास राव आणि मुक्ती राव यांच्या पुण्यातील धायरी येथील वास्तूत तालयोगी आश्रमाची उभारणी करण्यात आली असून ही वास्तू गुरू चरणी अर्पण करण्यात आली. दि. 4 एप्रिल 2011 रोजी तालयोगी आश्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी करवीर पीठाचे शंकराचार्य श्री विद्या नृसिंह भारती आणि परमपूज्य विष्णू महाराज पारनेकर यांचे शुभाशीर्वाद लाभले. पं. फिरोज दस्तूर फाउंडेशन, तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांचा शिष्यवर्ग आणि आप्तस्वकीयांनी केलेल्या आर्थिक सहकार्यातून आश्रमाची उभारणी करण्यात आली आहे.

विद्या द्यायची असते आणि कला संस्कारित करायची असते या तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांच्या उक्तीनुसार तालयोगी आश्रम गेली 12 वर्षे अखंडित कार्यरत आहे. महाराष्ट्रासह देशाच्या विविध प्रांतातून आलेले सुमारे चाळीस विद्यार्थी आश्रमात वास्तव्यास असून गुरू-शिष्य परंपरेद्वारे ज्ञानार्जन करीत आहेत. पुण्यातील शिष्यवर्गही येथे ज्ञानर्जन करीत आहे.

तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांची भारतीय अभिजात शास्त्रीय संगीतातील गुरू-शिष्य परंपरेविषयी एक ठाम विचारधारा आहे. संगीत हे शास्त्र, तंत्र, विद्या आणि कला या चार गोष्टींनी बांधले गेले आहे. शास्त्र शिकवायचे नसते तर ते समजवायचे असते. तंत्र शिकवायचे असते. कला शिकविणे आणि संस्कारीत करणे या दोन्हीत खूप फरक आहे. शिकविणे सोपे असते तर घडविणे कठीण असते. गुरू-शिष्य परंपरेत शिष्याला ज्ञान अवगत होईपर्यंत शिकवावे लागते. गुरूच्या समोर बसून शिकणारा शिष्य जेव्हा व्यासपीठावर सादरीकरण करेल त्या वेळी गुरूच्या मुखातून मिळणारी दाद ही शिष्यत्व पूर्ण होण्याची प्रक्रिया आहे. शिष्याचा कलाकार झाला पाहिजे, कलाकाराचा शिक्षक झाला पाहिजे, शिक्षकाचा गुरू झाला पाहिजे आणि गुरू आचार्य पदापर्यंत पोहोचला पाहिजे, अशा पद्धतीने तालयोगी आश्रमात विद्यार्थी घडविले जातात.

पंडित सुरेश तळवलकर मुंबई येथे वास्तव्यास असताना त्यांनी गुरूकुलाच्या माध्यमातून अनेक शिष्य व कलावंत घडविले आहेत. पंडिजींनी आपल्या शिक्षणपद्धतीमध्ये कलासापेक्ष संशोधन करून नवतेला आपलेसे केले तरी गुरूंकडून प्राप्त झालेल्या परंपरेलाही यथोचित सन्मान दिला आहे.

तालयोगी आश्रमाचे कार्य फक्त विद्यादानापुरते मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या सादरीकरणालाही महत्व दिले जाते. या करिता आश्रमात गुरूअभिवादन सोहळा, वर्धापन दिन, मासिक बैठक, बालकलारांची गुरूपौर्णिमा असे सांगीतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. या वैशिष्ट्यामुळे विद्यार्थ्याला आपण पूर्णवेळ संगीत साधना व प्रस्तुती करून उत्तम कलावंत होऊ शकतो हा आत्मविश्वास मिळतो.

तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांच्याविषयी..

पंडित सुरेश तळवलकर यांचा जन्म 1948 साली गिरगाव (मुंबई) येथे झाला. तळवलकर हे हिंदुस्थानी संगीतातील तबला वादक असून त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण वडिल दत्तात्रय तळवलकर यांच्याकडून घेतले. तबला वादनातील पुढील शिक्षणासाठी वडिलांनी त्यांना पंढरीनाथ नागेशकर यांच्याकडे सुपूर्द केले. आध्यात्मिक वृत्तीचे तबलागुरू पंडित विनायकराव घांग्रेकर यांच्या सान्निध्यामुळे पंडित तळवलकर यांना तबल्याचा रियाज म्हणजे अक्षरसाधनाच वाटू लागली. पंडित गजाननराव जोशी व पंडित निवृत्तीबुवा सरनाईक यांचेही तळवलकर यांना मार्गदर्शन लाभले आहे. पंडित तळवलकर यांना विशेषत: लखनौ, फरुखाबाद या घराण्यांची विद्या प्राप्त झाली आहे. सूक्ष्म लयकारीविषयीची आवड असल्यामुळे कर्नाटक संगीतातील मृदंगवादक, लयशास्त्राचे गुरू पंडित रामनाड ईश्वरन यांच्याकडून त्यांनी दाक्षिणात्य लयकारीचे शिक्षण घेतले आहे. सुप्रसिद्ध सारंगी वादक राम नारायण आणि शास्त्रीय गायक पंडित उल्हास कशाळकर यांना तळवलकर यांनी अनेक वर्षे तबला साथ केली आहे. ख्याल गायन, वाद्यसंगीत, कथक नृत्य यांना साथसंगत तसेच एकल तबलावादनात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला आहे. एकल तबलावादनात धिम्या लयीतील पेशकार प्रस्तुत करणे ही त्यांच्या वादनाची खासियत आहे. तबला वादनात पंडित तळवलकर यांनी स्वत: अनेक कायदे आणि चलने बांधलेली आहेत. पंडित सुरेश तळवलकर यांना केंद्र सरकारने पद्मश्री, करवीर पीठाने तालयोगी, श्री विष्णू महाराज पारनेरकर यांनी संगीत पूर्णाचार्य तसेच संगीत नाटक अकादमीने श्रेष्ठ कलाचार्य या पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. याच बरोबर इतरही अनेक मानाचे सन्मान त्यांना प्राप्त झाले आहेत.